बावधन बुद्रुकमध्ये ‘आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न; अध्यात्म-संविधान मूल्यांचा अनोखा संगम

पुणे – संविधान दिनाचे औचित्य साधत रविवारी सिद्धार्थ नगर, बावधन बुद्रुक येथे ‘आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. विकास प्रतिष्ठान व सुजता महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने आणि भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करून झाली. त्यानंतर संविधानाची प्रास्ताविका सामूहिकरीत्या वाचून लोकशाही मूल्यांप्रती दृढ निष्ठा व्यक्त करण्यात आली.

विकास प्रतिष्ठानचे संस्थापक आणि रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र प्रदेश युक्क आघाडीचे संघटक उमेश कांबळे यांनी स्वागतपर भाषणात सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांची दिशा मांडली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण मोहीमेपासून महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीपर्यंत सर्व उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान शिक्षणसम्राट राजेंद्र बांदल, पोलीस पाटील बबनराव दगडे, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर आणि पुणे मनपा सभागृह नेते बंडू केमसे यांनी संविधान मूल्ये, जागर परंपरा व नागरिकांच्या कर्तव्यांवर भाष्य केले.

सामाजिक उपक्रमांतर्गत नामदेवराव मोरे माध्यमिक विद्यालय, बावधन येथील २०० विद्यार्थ्यांना विकास प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांचा शाल, संविधान प्रत आणि ‘संविधान ट्रॉफी’ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासन कीर्तन पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रभावी संविधान कीर्तनाने उपस्थितांना भारावून टाकले.

कार्यक्रमास बबनराव दगडे पाटील, सुदामराव मुंडे, राजू मुंडे, राहुल दुधाळे, शैलेंद्र चव्हाण, संगीता आठवले, वैशाली कांबळे, पियुषा दगडे पाटील, दीपक दगडे, गणेश दगडे पाटील यांच्यासह बावधन परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा नेते अभिजित दगडे पाटील, बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन महाजन, शिवसेना नेते दत्ताभाऊ दगडे पाटील आणि संदीप वेडे पाटील यांचाचाही ‘संविधान प्रत’ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, शीलाताई पठाण आणि दीपक मस्के यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button