बुलढाण्यात बोगस मतदानाचा पर्दाफाश; दोन गाड्यांनी आणले बनावट मतदार, काँग्रेसचा आरोप

पुणे दि. 2 : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र मतदानास अवघे दीड तासही उलटत नाही तोच बुलढाणा जिल्ह्यात बोगस मतदानाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रात वैभव देशमुख या मतदाराच्या नावावर कोथळी (ता. मोताळा) येथील एका व्यक्तीने मतदान करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला पकडण्यात आले. त्याच्यासोबत आणखी एक जण असल्याचे समोर आले आहे.

काँग्रेसच्या विधान्यानुसार, कोथळी आणि इब्राहिमपूर येथून आणखी अनेकांना बुलढाण्यातील मतदान केंद्रांवर बोगस मतदानासाठी आणले जात आहे. याशिवाय घाटातून भरून दोन गाड्यांनी ग्रामीण भागातील बोगस मतदार बुलढाण्यात आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे उमेदवार दत्ता काकास यांनी अनेक मतदान केंद्रावर बाहेरगावाहून आणलेल्या व्यक्तीकडून मतदान करवून घेतले जात असल्याचा आरोप केला असून या संदर्भात पुष्टी देणारे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काही ठिकाणी बोगस मतदारांना प्रत्यक्ष पकडल्याची माहितीही उमेदवारांनी दिली आहे.

या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button