
पुणे दि. 2 : राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल जाहीर करण्याची तारीख बदलत 21 डिसेंबर निश्चित केली आहे.
राज्यातील काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे सुमारे 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. या ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी घोषित व्हावेत, अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
यावर सुनावणी घेत न्यायालयाने सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला एकत्र जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार असल्याने आचारसंहितादेखील 20 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त, स्ट्राँग रुम्सची व्यवस्था, मतमोजणी केंद्रे राखीव ठेवणे, तसेच रोज स्ट्राँग रुमची पाहणी यांसह प्रशासन व पोलिसांची यंत्रणा निकालापर्यंत सक्रिय राहणार आहे.