
पुणे, दि. 1 डिसेंबर : मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेतली. नवा रिंगरोड प्रकल्प पूर्ण होईपर्यंत महामार्गावरील सुरक्षिततेसाठी प्रशासकीय यंत्रणेनं तत्काळ राबवावयाच्या पाच महत्त्वपूर्ण उपाययोजना घोषीत कराव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी केल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे विभागीय उपायुक्त तुषार ठोंबरे, पुणे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम, तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांचे वरिष्ठ अभियंते, वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नवले ब्रिज परिसरातील अपघातांच्या पुनरावृत्तीमागील कारणमीमांसा, घाटातील उतार, वाहनांची अनियंत्रित गती, कोंडी, भारी वाहनांवरील नियंत्रण यावर सविस्तर चर्चा झाली. अनेक भीषण अपघातांमध्ये वेगावरील नियंत्रणाच्या अभावामुळे जीवितहानी वाढत असल्याचे लक्षात घेऊन उपसभापतींनी खालील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले:
तात्काळ राबवावयाच्या पाच महत्त्वपूर्ण उपाययोजना
रबर स्पीड ब्रेकर / रंबल स्ट्रिप्स बसवणे
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा मानकांचे पालन करून स्ट्रिप्स बसवण्यास प्राधान्य.
Action Oriented Plan (AOP) तयार करणे
अपघात किंवा कोंडीच्या वेळी त्वरित प्रतिसाद देण्यासाठी समन्वयित पथकांची उभारणी.
मोबाइल चेकपोस्ट / स्थिर चौकीची शक्यता तपासणे
विशेषतः भारी वाहनांच्या वेग नियंत्रण, ब्रेक तपासणी आणि ओव्हरलोडिंगवर नियंत्रण.
Public Address System बसवणे
उतार, पावसाळी स्थिती, वेग नियंत्रण, ट्रॅफिक अद्यतने चालकांना सतत देण्यासाठी ऑडिओ अलर्टची व्यवस्था.
फायर ब्रिगेड व रेस्क्यू टीम तैनात करणे
‘गोल्डन अवर’मध्ये मदत पोहोचण्यासाठी स्वतंत्र पथक, तसेच ट्रक मालक संघटनेसह ड्रायव्हर ट्रेनिंगचे आयोजन.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, नवले ब्रिज परिसरातील अपघातांची मालिका रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करून ‘आदर्श मॉडेल’ उभे करणे आवश्यक आहे. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी आणि याबाबतचा सविस्तर अहवाल 26 किंवा 27 डिसेंबर रोजी त्यांच्या समोर सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.