
पुणे, दि. 2 : नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना तपोवनातील साधुग्राम विकसित करण्यासाठी तब्बल 1825 झाडांच्या तोडीचा प्रस्ताव समोर आला असून या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याचदरम्यान साधुग्रामच्या जागेवर पीपीपी पद्धतीने (MICE प्रकल्प) एक प्रदर्शन केंद्र, बँक्वेट हॉल आणि रेस्टॉरंट उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने 220 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या प्रकल्पाअंतर्गत 35 एकर जागा 33 वर्षांसाठी खासगी विकासकाला देण्याची तरतूद आहे.
प्रकल्पानुसार, या जागेचा वापर कुंभमेळ्यासाठी केवळ 90 दिवस होणार असून उर्वरित सुमारे 31 वर्षे ती जागा खासगी भागीदाराकडे महसूल निर्मितीसाठी उपलब्ध राहणार आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.या संपूर्ण प्रकरणावर आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी महायुती सरकार आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“गिरीश महाजनांनी माहिती दडवली” — किर्दत
“झाडतोडीबाबत गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्ते आणि पत्रकारांना चुकीची माहिती दिली. झाडांच्या बदल्यात नवीन लागवड करण्याचे आश्वासन देताना, प्रत्यक्षात तिथे पीपीपी तत्त्वावर एक्झिबिशन हॉल उभारला जाणार असल्याची माहिती त्यांनी दडवून ठेवली,” असा आरोप मुकुंद किर्दत यांनी केला.
साधुग्रामची जागा बारा वर्षांतून एकदा होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राखीव असून उर्वरित काळ हरितवन म्हणून नाशिककरांच्या सेवेत असते. आता मात्र या जागेचा मोठा भाग खासगी व्यवसायासाठी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप किर्दत यांनी केला.
“ही सरकारची फसवणूक आणि अधर्मकारण”
किर्दत म्हणाले,
“सार्वजनिक जागा 33 वर्षांसाठी खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देणे म्हणजे नाशिककरांची सरळ फसवणूक आहे. हा प्रकल्प खासगी भागीदाराला आर्थिक फायदा मिळवून देण्याचा घाट असून हे महायुती सरकारचे उघड अधर्मकारणच आहे.”