
पुणे दि. 2 : देशात सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या शहरांपैकी एक असलेल्या पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत पुणे विमानतळाने १९ वा क्रमांक पटकावून ‘टॉप २०’ मध्ये स्थान मिळवले आहे. ही रँकिंग अलीकडेच ब्युरो ऑफ इमिग्रेशनने जाहीर केली.
लोहगावमध्ये स्थित पुणे विमानतळ प्रामुख्याने संरक्षण खात्याच्या अखत्यारीत आहे. विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग यासाठी भारतीय वायुदलाची धावपट्टी वापरण्यात येते, त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराला मर्यादा येतात. या सर्व कार्यात्मक अडचणी असूनही पुणे विमानतळाने मिळवलेले हे ‘टॉप २०’ मधील स्थान उल्लेखनीय ठरते.
सध्या पुणे विमानतळावरून दुबई आणि बँकॉक अशी केवळ दोनच आंतरराष्ट्रीय उड्डाणे उपलब्ध आहेत. तरीही मिळालेली ही रँकिंग विमानतळावर सुरू असलेल्या विकासकामांची, सुधारित सुविधांची आणि पुण्याच्या आंतरराष्ट्रीय संपर्कक्षमतेची साक्ष देणारी आहे.
पुणे शहर हे आयटी क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून, चाकण एमआयडीसीमधील जागतिक वाहन उत्पादक कंपन्यांमुळे ते ‘ऑटोमोबाईल हब’ म्हणूनही विकसित होत आहे. विस्तारित टर्मिनल इमारत, एरोमॉल, सुधारित प्रवासी सुविधा आणि उन्नत सेवा यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद झाला आहे, असे विमानवाहतूक तज्ञांचे मत आहे.
📌 कोट
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने अनेक नवी विमानतळे उभारली, तसेच विद्यमान विमानतळांवरही मोठ्या प्रमाणावर उन्नतीकरणाची कामे करण्यात आली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांत विमानतळावरील सुविधा आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या अपेक्षांनुसार मोठ्या प्रमाणात उन्नत झाल्या आहेत.”