व्ही. शांताराम’चा भव्य बायोपिक; पहिले पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

पुणे दि. 1 : भारतीय चित्रपटसृष्टीला नवे तत्त्वज्ञान, नवी सौंदर्यभाषा आणि धडाडीची दृष्टी देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे अर्थात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचे वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्य मेगा-बायोपिकमधून मोठ्या पडद्यावर साकारले जात आहे. स्टुडिओतील सामान्य कामगारापासून जागतिक दर्जाचे चित्रपटकार होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्ष, प्रयोगशीलता आणि कलाप्रेमाचा अनोखा मिलाफ होता. हा संपूर्ण प्रवास आता सिनेमॅटिक रीतीने अनुभवायला मिळणार आहे.

‘झनक झनक पायल बाजे’च्या नृत्यवैभवापासून ‘दो आंखें बारह हाथ’च्या सामाजिक संदेशांपर्यंत आणि ‘अमृतमंथन’पासून ‘नागरिक’पर्यंत व्ही. शांताराम यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवे मूल्य दिले. त्यांच्या कल्पनाशक्तीचा, तांत्रिक प्रयोगांचा आणि सिनेमॅटिक भाषेचा प्रभाव आजही जाणवतो.

या महाकाव्यात्मक बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर उत्साहाची लाट उसळली आहे. पोस्टरची भव्यता आणि दृश्य वैभव पाहून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी या चित्रपटात व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या कारकिर्दीतील ही भूमिका एक ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे या बायोपिकचे लेखन-दिग्दर्शन करत आहेत. भव्य दृश्यरचना, कलात्मक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक सिनेमाई अनुभव देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणाले,
“व्ही. शांताराम म्हणजे एक संपूर्ण विचारप्रवाह. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, प्रयोगांची हिंमत आणि कलाप्रती निष्ठा पडद्यावर साकारताना हा एक आध्यात्मिक प्रवास झाला.”

निर्माते राहुल किरण शांताराम म्हणाले,
“हा चित्रपट म्हणजे आमच्या आजोबांना वाहिलेली भव्य श्रद्धांजली. त्यांच्या योगदानाची विशालता नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश.”

निर्माते सुभाष काळे म्हणाले,
“व्ही. शांताराम म्हणजे भारतीय चित्रपटाची परंपरा आणि वैभव. त्यांच्या प्रत्येक प्रयोगात नवा विचार होता. हा आत्मा आम्ही चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत.”राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन प्रस्तुत हा भव्य चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button