गिरीश महाजन यांनी नाशिककरांची तातडीने माफी मागावी; प्रस्तावित वृक्षतोड त्वरित रद्द करा – आम आदमी पार्टी

पुणे दि. 1: “गिरीश महाजन यांनी नाशिककरांची माफी मागून तातडीने वृक्षतोड रद्द करावी,” अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. आज रविवारी सकाळी आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, अँड. प्रभाकर वायचळे, नाविंदर अहलुवालिया, शहराध्यक्ष अमोल लांडगे, महिला शहराध्यक्षा शेतांबरी आहेर, शहर संघटक अनिल कौशिक, युवा शहराध्यक्ष अमर गांगुर्डे, उपाध्यक्ष गणेश निर्भवणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी तपोवन, नाशिक येथील प्रस्तावित खाजगी साधुग्राम आणि वृक्षतोड स्थळाची पाहणी केली.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना आणि माध्यमांशी बोलताना राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले की,
“गिरीश महाजन आणि प्रशासन यांचे स्पष्टीकरणच दिशाभूल करणारे आहे. वृक्ष अधिनियम 1975 च्या कलम 5A नुसार ‘एकास दहा झाडे’ नाही, तर त्या झाडाच्या वयाएवढी झाडे लावणे कायदेशीर बंधनकारक आहे. ३० वर्षांचे झाड कापले तर ३० झाडे – तीही ६ फूट उंच, १५ दिवसांत लावून ७ वर्षे निगा ठेवणे आवश्यक आहे. महाजन यांचे आश्वासन कायद्याला धरूनच नाही.”*

यावेळी त्यांनी पूर्वीच्या वृक्षलागवड अपयशाची उदाहरणेही दिली. २०१७ मध्ये पुणे–नाशिक महामार्गासाठी झालेल्या वृक्षतोडीबाबत लावावयाची ३९ हजार झाडे २०२५ पर्यंतही लावलेली नाहीत, म्हणून राष्ट्रीय हरित लवादाने ताशेरे ओढले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर लावावयाच्या १ लाख झाडांपैकी २० वर्षांत ४० हजारही पूर्ण नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे पुण्यात २० महिन्यांत २२,३६२ झाडे कापली गेली, परंतु भरपाई म्हणून लावावयाच्या ३.४ लाख झाडांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे त्यांनी सांगितले.
५२ कोटी वृक्षलागवड प्रकल्पाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “याचा हिशोब फक्त मुनगंटीवार यांनाच माहीत असावा,” अशी टीका त्यांनी केली.

किर्दत यांनी पुढे सांगितले की,
“नदी, सूर्य, वड, शमी, पिंपळ यांचा सगळ्या धर्मांमध्ये मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांनी वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे. वृक्षतोड म्हणजे पाप, असे शंकराचार्य सरस्वती यांनीही म्हटले आहे.”

तसेच प्रस्तावित २२० कोटींच्या एक्झिबिशन सेंटरवर तीव्र आक्षेप घेत त्यांनी विचारले की,
“संतभूमी, साधुग्राम आणि तपोवन नष्ट करून हे प्रकल्प उभे करणार असतील, तर कुंभमेळा हे केवळ निमित्त आहे का? 12 वर्षांनी साधूंसाठी मुक्काम कुठे असणार? खाजगी साधुग्राम म्हणजे भाजपचे धर्मकारण आहे का?”

शेवटी, “ही सर्व फसवाफसवी आणि कंत्राटांतील हितसंबंध असून गिरीश महाजन यांनी नाशिककरांची तसेच साधूंची माफी मागावी. भाजपा ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे स्थानिक आणि राज्य पातळीवरील निर्णय नाशिकवर लादणे आहे. नाशिकच्या भावनांचा आदर करावा,” असे आवाहन आम आदमी पार्टीने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button