
पुणे दि. 1 : नांदेडमध्ये सक्षम ताटे (वय १९) या तरुणाची आंतरधर्मीय प्रेमसंबंधातून निर्घृण हत्या झाल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला ऑनर किलिंगचे स्वरूप असल्याची चर्चा असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते नांदेड येथे जाऊन सक्षमच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांना सांत्वन करत न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
सदावर्ते यांनी पोलीस अधीक्षक (SP) आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) यांची भेट घेऊन आरोपींविरुद्ध दुसरा एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केली आहे. सक्षमचे आई-वडील तसेच त्याची प्रेयसी आंचल मामीडवार यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.कायदेशीर लढ्याबाबत बोलताना सदावर्ते म्हणाले की, जर सक्षमच्या कुटुंबीयांनी लेखी स्वरूपात विनंती दिली, तर आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशीची शिक्षा होऊ शकते, असा त्यांचा विश्वास आहे.