
पुणे : “जीवनात रहस्य नसेल तर जीवनाला अर्थ नाही. प्रश्नांसोबत जगत राहिलो तर जीवन कधी संपले हेच कळणार नाही. अडचणी या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, पण ह्याच अडचणी आपली शक्ती वाढवतात. तसेच माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती आहे,” असे प्रतिपादन सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रम्हर्षी गुरुदेव यांनी केले.
विश्व धर्म चेतना मंच, पुणे व पीसीएमसी परिवार यांच्या वतीने आयोजित ‘सिद्धि साधना का महाआशीर्वाद’ या महाप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. तब्बल ६८ दिवसांच्या अग्नि महासाधनेनंतर ब्रम्हर्षी गुरुदेवांनी उपस्थितांना जीवनमूल्यांवरील सखोल शिकवण दिली.
या कार्यक्रमाला मंचचे राज्याध्यक्ष उत्तम बाठीया, आयोजक सुमित चंगेडीया, प्रायोजक महावीर बाठीया, प्रीतेश कटारिया, संतोष लगडे, राहुल बोगावत, स्वप्निल गांधी, भावेश चोरडिया यांसह मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कौटुंबिक मूल्यांच्या ऱ्हासाबाबत गंभीर चिंता व्यक्त करत गुरुदेव म्हणाले, “तंत्रज्ञानामुळे घरातील संवाद कमी होत आहे. रागासोबत प्रेमही व्यक्त करा. घरातील संवाद वाढवा. चेहऱ्यावरचे हास्य कायम ठेवा, तेच आनंदी जीवनाचा पाया आहे.”
जीवनातील भेदभाव फोल असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले, “मुंगी आणि हत्तीची तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक जीवन वेगळे आहे, रहस्यांनी भरलेले आहे. त्या रहस्यातच जीवनाचा अर्थ दडलेला आहे. सुखाचा पाठलाग करू नका; जे आहे त्यात आनंद शोधा.”
कार्यक्रमाच्या शेवटी मोठ्या संख्येने उपस्थित अनुयायांनी गुरुदेवांचे आशीर्वचन ऐकून आध्यात्मिक ऊर्जा अनुभवली असल्याचे सांगितले.