
पुणे दि. 30 : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता काहीच तास शिल्लक असताना मोठा निर्णय समोर आला आहे. निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश जारी केले आहेत.
फलटण आणि महाबळेश्वर येथे नवीन मतदानाची तारीख ठरवण्यात आली असून 20 आणि 21 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेबाबत जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. न्यायालयाने या याचिकांचा निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला असल्याने आयोगाने निवडणूक पुढे ढकलणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
बारामती नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सात प्रभागातील उमेदवारांविरोधात दाखल याचिकेवर सत्र न्यायालयाने सुनावणी करत याचिका फेटाळली. तरीही नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार, अपिलाची मुदत अद्याप संपलेली नसल्याने आयोगाने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाने या संदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले असून पुढील तारखेनुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.