
पुणे दि.30 : रिपब्लिकन पक्षामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असून विशेषतः पुणे महापालिका निवडणुकीत अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला वीस जागांची मागणी करणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
रिपब्लिकन पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा संगीता आठवले यांच्या वारजे येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, “पुणे महापालिकेत रिपब्लिकन चळवळीचा आवाज पोहोचला पाहिजे. समाजातील गरिबांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी निवडणुकीत पात्र कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल.”
उद्घाटन सोहळ्यात संगीता आठवले यांनी पुणे शहरात व वारजे–माळवाडी परिसरात केलेल्या विविध सामाजिक कार्यांचा आढावा घेतला. कार्यक्रमादरम्यान त्यांनी रामदास आठवले यांना तैलचित्र भेट दिले.
या कार्यक्रमास माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, शुक्राचार्य वांजळे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, अशोक गायकवाड, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेश चव्हाण, महेंद्र कांबळे, तसेच आप, प्रहार संघटना, रासप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आदी विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.