
पुणे, दि. २९ नोव्हेंबर: “अध्यात्म आणि मन यांचा अतूट संबंध असून मनामधील विचारांची शक्तीच व्यक्तिमत्त्व घडवते. सकारात्मक आणि स्पष्ट विचारच उज्ज्वल भविष्याला दिशा देतात,” असे सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे-पाटील यांनी सांगितले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरूड, पुणे आयोजित ३० वी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर व संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला येथील सहाव्या पुष्पप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला केशव वेल्हाळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये तसेच प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, ॲड. रियाज पडवीकर, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते.
केशव वेल्हाळ म्हणाले, “ओम हे सृष्टीचे मूळ आणि विश्वाचे प्रतीक आहे. ओम क्वांटम कम्प्युटिंग ही तंत्रज्ञानातून जागतिक शांततेकडे जाणारी दिशा आहे.”
डॉ. संजय उपाध्ये यांनी सांगितले, “संतसाहित्य समदृष्टी आणि समानतेची भावना निर्माण करते. मानवतातीर्थ भवन हे मानवतेचे जागतिक प्रतीक बनले आहे. डॉ. कराड यांचे विश्वशांतीचे कार्य अमूल्य आहे.”
डॉ. एस. एन. पठाण म्हणाले, “सांप्रदायिक ऐक्याची आज समाजाला नितांत गरज आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्यातून अनेक प्रश्न सुटू शकतात. मानवताच सर्वांची जोड आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या पलीकडे जाऊन स्वराज्य उभारले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार आत्मसात केल्यास विश्वमानवतेकडे वाटचाल शक्य आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग खानविलकर यांनी केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी प्रास्ताविक केले व डॉ. मंदार लेले यांनी आभार मानले.