
पुणे दि. 29 : नाशिकमधील तपोवन परिसरात 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘साधूग्राम’साठी नियोजित असलेल्या वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. स्थानिक पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या चालू आंदोलनाला त्यांनी प्रत्यक्ष हजर राहून पाठिंबा दिला.
नाशिक महापालिकेने साधू-महंतांच्या निवासासाठी तपोवन परिसरात ‘साधूग्राम’ उभारण्याची योजना आखली असून, याकरिता १८०० हून अधिक झाडे तोडण्याची किंवा पुनर्रोपण करण्याची प्रस्तावित योजना आहे. याच निर्णयाला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला असून, शिंदेंच्या उपस्थितीने या आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे.
वृक्षसंवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘सह्याद्री देवराई’ या संघटनेचे नेतृत्व करणारे सयाजी शिंदे म्हणाले, “झाडे ही आमचे आईबाप आहेत. त्यांच्यावर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही. साधू आले-गेले तरी झाडं टिकलंच पाहिजेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे काही साधू-महंतांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.
दुसरीकडे, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वृक्षतोड अटळ असल्याचे सांगत, “एका झाडामागे दहा-पंधरा झाडे लावू,” असे आश्वासन दिले आहे. मात्र, ही भरपाई पुरेशी नाही, असे पर्यावरणप्रेमी म्हणत आहेत.
तपोवनला भेट देऊन शिंदेंनी आंदोलनकर्त्यांची भूमिका ऐकून घेतली आणि नाशिककरांना “सरकारच्या वृक्षतोडीच्या निर्णयाविरुद्ध एकत्र यावे” असे आवाहन केले आहे.
या निर्णयावरून सध्या नाशिकमध्ये मोठे राजकीय आणि धार्मिक वादंग निर्माण झाले आहे.