राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव; 30 नोव्हेंबर रोजी स्वीकारतील पदभार

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून, अग्रवाल त्याच दिवशी पदभार स्वीकारणार आहेत.

राजेश अग्रवाल यांचा परिचय

राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे 1989 बॅचचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांचे मूळ गाव पंजाबमधील जालंधर असून त्यांनी कॉम्प्युटर सिस्टिम्समध्ये बी.टेक शिक्षण पूर्ण केले आहे.

आपल्या दीर्घ सेवा कारकिर्दीत त्यांनी राज्य आणि केंद्र शासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यात सहायक जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अकोला, महाराष्ट्र सदन नवी दिल्लीतील उप विशेष आयुक्त, तसेच केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव अशा विविध पदांचा समावेश आहे.

अग्रवाल यांनी भारत निवडणूक आयोग, सामान्य प्रशासन विभाग, कृषी व मत्स्यव्यवसाय विभाग, सामाजिक न्याय विभाग, वित्त विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग अशा अनेक संवेदनशील व महत्त्वाच्या खात्यांमध्ये सचिव आणि प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.

केंद्र शासनातही त्यांनी आदिवासी विकास विभाग, कौशल्य विकास विभाग, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू विभागात अतिरिक्त सचिव आणि वित्त सल्लागार, तसेच सामाजिक न्याय विभागाचे सचिव म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

राज्य व केंद्र शासनातील समृद्ध प्रशासकीय अनुभवाची साथ आणि विविध विभागांतील सखोल कामगिरीच्या जोरावर आता ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button