तनुजा आणि काजोल यांच्या उपस्थितीत ‘उत्तर’चा ट्रेलर लाँच; १२ डिसेंबरच्या रिलीजची उत्सुकता शिगेला!

मुंबई, दि. 28 : सध्या ‘आईला माहीत असतं!’ या वाक्याने आणि ‘हो आई!’ या गाण्याने चर्चेत असलेल्या ‘उत्तर’ या चित्रपटाचा प्रभावी ट्रेलर लाँच सोहळा तनुजा आणि काजोल यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. आई-मुलाच्या नात्याचा आजच्या काळातील प्रवास सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आधीच जागा करून बसला आहे.

लाँच दरम्यान काजोल आणि तनुजा यांनी प्रेक्षकांना ‘आईसोबत’ किंवा ‘आईसाठी’ हा सिनेमा पाहा असे प्रेमळ आवाहन केले.

या ट्रेलरची खासियत म्हणजे आई आणि मुलामधील नात्याला स्पर्शून जाणारे संवाद, प्रभावी चित्रीकरण आणि साऊंड डिझाइनवर घेतलेली विशेष मेहनत. त्यामुळे ट्रेलरने प्रत्येकाच्या मनात आईबद्दलच्या भावनांना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

चित्रपटात रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ऋता दुर्गुळे, निर्मिती सावंत यांची महत्त्वाची भूमिका असून, पहिल्यांदाच ‘अनमिस’ नावाचे एक एआय पात्रही यात झळकणार आहे.

‘डबलसीट’, ‘फास्टर फेणे’ यांसारखे चित्रपट व ‘दोन स्पेशल’, ‘भूमिका’ सारखी नाटकं देणारे क्षितिज पटवर्धन यांनी ‘उत्तर’मध्ये कथा, पटकथा आणि पहिल्यांदाच दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. तनुजा म्हणाल्या :

“चित्रपटाचे नावच महत्त्वाचे आहे. आईकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. ट्रेलर खूप सुंदर आणि मनाला भिडणारा आहे. हा चित्रपट मी नक्की बघणार आहे.”

काजोल म्हणाल्या :

“ट्रेलर मला खूप आवडला. आई-मुलाचे नाते आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव याचा सुंदर भावनिक संगम यात दिसतो. मी आईसोबत लवकरच हा चित्रपट पाहणार आहे.”

दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाले :

“हा सिनेमा फक्त माझा नाही, तर मराठी सिनेमाचं अनेक प्रश्नांना दिलेलं उत्तर आहे! हा आईच्या प्रेमाला दिलेला छोटासा रिटर्न गिफ्ट आहे.”

झी स्टुडिओज मराठीचे बवेश जानवलेकर म्हणाले :

“मराठी सिनेमाचा हिरो म्हणजे त्याची गोष्ट! आणि येथे या गोष्टीसोबतच ‘आई’ हा खरा हिरो आहे. रेणुका शहाणे यांनी भूमिका अप्रतिम साकारली आहे. हा चित्रपट सर्व वयोगटांना आवडेल.”

झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी निर्मिती केलेला ‘उत्तर’ १२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button