हिवाळ्यात कमी पाणी पिणे ठरू शकते धोकादायक; डिहायड्रेशनमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो

पुणे दि. 28 : हिवाळ्यात कमी पाणी पिणे धोकादायक आहे, कारण शरीराला थंडीतही पाण्याची गरज असते. शरीरातून श्वसन आणि इतर प्रक्रियांमुळे सतत पाणी कमी होत असते. म्हणून, थंडीतही पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. जर तुम्हाला पाणी पिण्याची इच्छा होत नसेल, तर तुम्ही गरम पाणी, हर्बल टी किंवा कोमट पाण्यात लिंबू घालून पिऊ शकता. पाण्याचे सेवन घटल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. कोणताही ऋतू असो, शरीर ‘हायड्रेट’ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्याने शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर निघत नाहीत आणि विविध आजारांची शक्यता वाढते.

मानवी शरीरात सुमारे 60 टक्के पाणी असते आणि दररोज साधारण 2.5 लिटर पाणी शरीरातून बाहेर पडते. शरीरात 10 टक्के पाणी कमी झाल्यावरच आपल्याला तहान जाणवते. त्यामुळे दिवसभरात नियमित अंतराने पाणी पिणे आवश्यक आहे. हिवाळ्यात कमी पाणी पिल्याने डिहायड्रेशन होऊन त्याचा थेट परिणाम मेंदूवर होऊ शकतो. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता वाढते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, थंड वातावरणात ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो आणि कमी पाणी पिणे हे त्यातील महत्त्वाचे कारण आहे. डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत पक्षाघाताचा धोका संभवतो.

पाणी कमी पिल्याने किडनीवरील ताणही वाढतो. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास किडनीला अधिक काम करावे लागते, ज्यामुळे किडनी स्टोन तसेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते.

आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, हिवाळ्यातही नियमितपणे पाणी प्या, शरीर हायड्रेट ठेवा आणि गंभीर आजारांपासून बचाव करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button