
मुंबई दि. 27 : राज्यातील मतदार याद्यांमधील घोटाळ्यांची मालिका थांबतानाचं नाव घेत नाही. याच पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा एक मोठा उघड केला आहे. मनसेचे अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांच्या नावानेच बोगस मतदारांची नोंद करण्यात आल्याचा धक्कादायक तथ्य समोर आले आहे.
धुरी यांच्या फोटोसमोर बंगाली भाषेत दास भुटो सुकुमार असे पूर्णपणे वेगळे नाव तर त्यांच्या बहिणीच्या फोटोसमोर शेख निशा यतिम असे नाव लावल्याचे उघड झाले. यामुळे मनसेने संतप्त प्रतिक्रिया नोंदवत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुंबईतच 11 लाख दुबार मतदार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा नवा घोळ उघड झाल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल मनसेने तीव्र नाराजी दर्शवली. या प्रकरणात मनसेकडून अधिकृत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ, दुबार नावे आणि चुकीच्या नोंदी असल्याचा आरोप केला होता. धुरी यांनी चेतावणी दिली की, “निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.”
मनीष धुरी यांनी 2009 आणि 2014 साली विधानसभा निवडणूक लढवली असून सध्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार भाजपचे अमीत साटम आहेत.