
पुणे दि. 27 : सिनेसृष्टीत तब्बल सहा दशकं अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या ८९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धरमजींच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. देओल कुटुंबासह लाखो चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अशातच त्यांच्या पत्नी आणि बॉलिवूडची ड्रिम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करत पतीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
हेमा मालिनी म्हणतात,
“धरमजी माझ्यासाठी खूप काही होते… प्रेमळ पती, आमच्या मुली ईशा आणि अहानाचे प्रेमळ वडील, मित्र, फिलॉसफर, मार्गदर्शक… गरजेच्या प्रत्येक क्षणी माझ्यासाठी उपस्थित राहणारा. ते माझ्यासाठी सर्वकाही होते. त्यांनी माझ्या कुटुंबाला नेहमीच प्रेम आणि आदर दिला.”
पुढे त्या लिहितात,
“एक पब्लिक पर्सनॅलिटी म्हणून त्यांची लोकप्रियता, विनम्रता आणि सर्वांना आपलंस करणारी शैली त्यांना एक ‘युनिक आयकॉन’ बनवते. त्यांची शाश्वत कीर्ती अमर राहील. माझं वैयक्तिक नुकसान शब्दांत सांगता येणार नाही. आपल्या अनेक आठवणी आता मी पुन्हा पुन्हा जगत राहीन.”
धरमजींच्या निधनाने बॉलिवूडने एक मोठा दिग्गज कलाकार गमावला आहे.