संविधान दिनानिमित्त पुण्यात रंगला ‘संविधान लोककला शाहिरी जलसा’; शाहिरांच्या बहारदार सादरीकरणाने मंत्रमुग्ध पुणेकर

पुणे दि. 27 : “होता भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाई…”, “जगातली देखणी बाई मी भीमाची लेखणी…” अशा बहारदार शाहिरी गीतांच्या तालावर संविधान मूल्ये, सामाजिक समता आणि लोकशाहीची ताकद लोककलेद्वारे अनुभवण्याचा अद्वितीय जलसा पुणेकरांनी अनुभवला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित ‘संविधान लोककला शाहिरी जलसा’ संविधान दिनाच्या औचित्याने “माझे संविधान – माझा अभिमान” या संकल्पनेतून पार पडला.

या कार्यक्रमात शाहीर शीतल साठे, सचिन माळी, सदाशिव निकम, पृथ्वीराज माळी आदींनी बहारदार शाहिरी सादर करत वातावरण भारून टाकले.

कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, रिपाइं (आठवले) पक्षाचे पदाधिकारी पप्पू कागदे, संजय सोनवणे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. ‘भीमराया वंदाया कवन शाहिरी’ या गीतानंतर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांच्यावर आधारित पोवाडे आणि लोकगीतांनी माहोल रंगला.

‘कुणी नाही केलं माय माझ्या भिमाने केलं’, ‘देश उभा केला संविधानाने’, ‘चांदण्याची छाया माझा भीमराया’ अशा लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

समिती अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती व लोकशाहीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

यावेळी प्रामाणिक सफाई कामगार अंजू माने यांनी कचरा वेचताना सापडलेली दहा लाख रुपयांची बॅग मूळ मालकास परत केल्याबद्दल त्यांचा पाच हजार रुपयांत गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सूत्रसंचालन अॅड. ज्ञानेश्वर जाविर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button