
पुणे दि. 27 : हिंजवडी आयटी पार्क परिसरात अंगणवाडीतील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मिळून तब्बल २० लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून बाहेरून कुलूप लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एबीपी माझा यांच्या हाती लागलेल्या व्हिडिओमध्ये मुलं अक्षरशः रडत असल्याचं स्पष्ट दिसत असून या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली. सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जाण्यासाठी मुलांना आत कोंडल्याचा स्वीकार केला आहे.
बुधवार, ता. २६, सकाळी ११ ते १२ या वेळेत हा प्रकार घडला. उपस्थितांनी ही माहिती मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी तातडीने दोघींना बैठक सोडून अंगणवाडीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले.
काही वेळासाठी का असेना, इतक्या लहान मुलांना बंद खोलीत कोंडून ठेवणे हे अत्यंत धोकादायक आणि संतापजनक असल्याचे व्हिडिओतील मुलांच्या रडण्याच्या आवाजावरून स्पष्ट होत आहे. आता या प्रकरणात बाल विकास विभागाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.