
पुणे दि. 27 : स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न. विशेषत: मोठ्या शहरांत नोकरी करणाऱ्यांसाठी हे स्वप्न पूर्ण करणे कठीण ठरत असते. अशा परिस्थितीत सरकारची म्हाडा योजना अनेकांना मोठा दिलासा देते. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांत म्हाडाच्या गृहनिर्माण योजनांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आला आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने जाहीर केलेल्या ४,१८६ घरांसाठीच्या सोडतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. एकूण १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १,३३,८८५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज पूर्ण केले आहेत. त्यामुळे एका घरासाठी सरासरी ४३ अर्ज पडले आहेत.
२७ आणि २८ ऑक्टोबर रोजी अर्ज भरताना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीत झालेल्या विलंब यांची दखल घेत, म्हाडा पुणे मंडळाने अर्ज करण्यास अंतिम मुदतवाढ दिली आहे. हीच अंतिम संधी असल्याचेही म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवीन सुधारित अंतिम मुदती :
ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन अनामत रक्कम भरणे:
३० नोव्हेंबर २०२५ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरणाऱ्यांसाठी:
०१ डिसेंबर २०२५ (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)
संगणकीय सोडत दिनांक:
११ डिसेंबर २०२५, दुपारी १२:०० वाजता
म्हाडा पुणे मंडळाने नागरिकांना स्पष्ट सूचना केली आहे की सोडत प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय आणि पारदर्शक असल्याने कोणत्याही एजंट किंवा सल्लागारांवर विश्वास ठेवू नये. अंतिम मुदत वाढल्याने अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.