
पुणे दि. 27 : संविधान दिनानिमित्त एन.एस.यू.आय महाराष्ट्र तर्फे आयोजित ‘संविधान यात्रा’ हा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दणदणीत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. संविधानावरील निष्ठा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची उजळणी आणि संविधान मूल्यांची जपणूक यासाठी विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष उभारी दिली.
यात्रेची सुरुवात विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. “संविधान केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर तो देशाच्या आत्म्याचा दस्तऐवज आहे,” या बाबासाहेबांच्या विचारांचा प्रत्यय यात्रेतील प्रत्येक घोषणेतून आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. हनुमंत पवार आणि संविधान अभ्यासक श्री. जयकर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “संविधान वाचवण्याचा हा संघर्षाचा काळ आहे… देशाच्या एकतेसाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे,” असे प्रतिपादन करत श्री. पवार यांनी संविधान रक्षणाचे महत्व अधोरेखित केले.
यात्रेदरम्यान स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही संविधानातील मूलभूत तत्त्वे प्रत्येक नागरिकाच्या जगण्याचा पाया असल्याची जाणीव विद्यार्थ्यांनी पुन्हा दृढ केली. शिक्षण आणि समाजकारणातून परिवर्तन घडवण्याच्या निर्धाराने संपूर्ण परिसर उत्साहाने भारला.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अक्षय कांबळे (प्रदेश उपाध्यक्ष, NSUI महाराष्ट्र) आणि अभिजीत गोरे (जिल्हा अध्यक्ष, NSUI पुणे) यांनी केले. तसेच सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, प्रदेश महासचिव जयदीप सूर्यवंशी, शीतल उबाळे, अनिकेत भंडारे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत जांभूळकर यांच्यासह पुणे जिल्हा व विद्यापीठ NSUI कार्यकारिणीची उपस्थिती यात्रेची शोभा वाढवणारी ठरली.
विद्यार्थ्यांच्या जयघोषात संविधान रक्षणाची प्रतिज्ञा घेण्यात आली आणि संविधान जागरुकतेसाठी अशाच उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.