मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याची मागणी — आंबेडकरी सांस्कृतिक स्मारक समितीची भूमिका ठाम

पुणे  दि. 27 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या वतीने विश्रांतीगृह क्र. १०५, शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाबाबत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्मारकाच्या विकासासाठी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली.

समितीने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आंबेडकर स्मारकाच्या जागेचे विकसन, संस्कृती भवन उभारणी, ग्रंथालय, संग्रहालय, विविध सांस्कृतिक उपक्रमांची केंद्रे यांसाठी सुमारे २००० कोटींच्या निधीची गरज असल्याचे मागणीपत्र राज्य शासनाकडे सादर करण्यात आले आहे. तरीही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

समितीचे पदाधिकारी म्हणाले की, १८ नोव्हेंबर २०१६ रोजी राज्य शासनाने या संदर्भात बैठक घेतली होती आणि महत्त्वाचे निर्णय घेतले होते. मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत मंद असून निधी मंजुरी व प्रशासकीय कार्यवाहीत दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या स्मारकाच्या कामात गती यावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

डॉ. आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीने सांगितले की, हे स्मारक हे केवळ इमारत नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. पिढ्यान्‌पिढ्या प्रेरणा देणाऱ्या या स्मारकाच्या उभारणीला विलंब होऊ नये म्हणून जनआक्रोश आंदोलनाची तयारीही समितीकडून व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button