
पुणे, दि. 27 : ’ असुरवन चित्रपटाच्या टीमने नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या तीरावर विधीवत गोदा आरती करून चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात केली. हर हर गंगे! हर हर गोदा! या जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्यात असुरवन टीमने गोदामाईचे आशीर्वाद घेतले. येत्या ५ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या रहस्यमय मराठी चित्रपटाच्या प्रचारासाठी टीम नाशिक दौऱ्यावर आहे.
नाशिकमध्ये टीमने प्रथम नवश्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर विविध रेडिओ संस्थांना भेट देत प्रमोशन पूर्ण केले आणि पुढे पंचवटीतील प्राचीन गोदावरी घाटावर श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या उपस्थितीत गोदा आरतीसाठी पोहोचले.
यावेळी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात, अभिनेते विश्वास पाटील, सूरज नेवरेकर, विशाल साठे, अभिनेत्री दीप्ती धोत्रे उपस्थित होते. समितीकडून टीमला चित्रपटाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
स्वप्नस्वरूप प्रस्तुत ‘असुरवन’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक सचिन आंबात असून चित्रपटात विश्वास पाटील, सुरज नेवरेकर, दीप्ती धोत्रे, अनुज ठाकरे, सचिन चांदवडे, विपुल साळुंखे, विनायक चव्हाण, पूजा मौली, मयूरेश जोशी, रोहिणी थोरात, सिद्धेश शिंदे, विशाल साठे, संदीप पाटील यांच्यासह अनेक कलाकार झळकणार आहेत.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महाराष्ट्राच्या मातीचा गंध जाणवतो. कोकणातील आदिवासी वारली संस्कृती, शापित डोंगर माऊलीची कथा, रहस्यमय सूर्यमुखी चेहऱ्याचा गूढ आणि “खबर कलली का?” या आगरी भाषेतील दमदार डायलॉगने आधीच उत्सुकता वाढवली आहे.
थ्रिलर, सस्पेन्स, गूढ आणि हलक्या फुलक्या विनोदाने परिपूर्ण असा हा चित्रपट प्रेक्षकांना पूर्ण मनोरंजनाची हमी देणार आहे. ’असुरवन’ ५ डिसेंबरपासून थिएटर्समध्ये पाहायला मिळणार आहे.