
पुणे : पारदर्शक व्यवहार, विश्वासार्ह सेवा आणि ग्राहकाभिमुख कामकाजाच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या दी प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) वेल्फेअर असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीचा नुकताच सत्कार करण्यात आला. २०२५-२०२७ या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी उदयन माने, उपाध्यक्षपदी तनुज नगरानी व नीरज सिंग, सचिवपदी मनीष दीडमिसे, तर खजिनदारपदी मुरली रमणी यांची निवड झाली.
नव्या कार्यकारिणीत संचालक म्हणून ऍड. महेश यादव (प्रॉप ग्रोथ), दिनेश राठी (प्रशिक्षण व मेंटरशिप सर्कल्स), विक्रम मलिक (बिझनेस एक्स्चेंज व क्रॉस सेल), सारंग मद्रेवार (क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम), रवींद्र यादव (डिजिटल, पीआर व मीडिया) आणि प्रीत कोहली (इव्हेंट्स, एंगेजमेंट व नेटवर्किंग) यांची निवड झाली आहे.
मावळते अध्यक्ष दर्शन चावला आणि संस्थापक अध्यक्ष किशन मिलानी, तसेच खालिद मेनन सल्लागार मंडळात असून ‘एनएआर इंडिया’चे चेअरमन रवी वर्मा मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहतील.
अध्यक्ष उदयन माने म्हणाले, “पुणे आणि पीसीएमसी परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिकांचे व्यापक प्रतिनिधित्व करणारी ‘प्रॉप’ ही संस्था नॅशनल असोसिएशन ऑफ रिअल्टर्स-इंडियाशी संलग्नित आहे. पुणे बांधकाम क्षेत्रात झपाट्याने पुढे जात आहे. या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट एजंटसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमाणित सदस्यांची डायरी, घर खरेदी-विक्री प्रक्रियेबाबत ग्राहक जनजागृती सत्रे या उपक्रमांमुळे विकसक, कायदा तज्ज्ञ आणि नियामक यांच्यात समन्वय अधिक बळकट होतो.”
‘प्रॉप’चे सर्व सदस्य रेरा नोंदणीकृत असून त्यांनी रेरा परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने होणारे प्रशिक्षण, ‘नरडेको’ आणि ‘क्रेडाई’शी असलेले संलग्न धोरणात्मक सहकार्य, तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिअल इस्टेटमार्फत विशेष कौशल्य-वृद्धी कार्यक्रम यामुळे सदस्यांना जागतिक दर्जाच्या पद्धतींचे ज्ञान मिळते.
संस्थेचे माजी अध्यक्ष दर्शन चावला म्हणाले, “प्रॉपकडे स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा असून वेळेवर व सुबद्ध रीतीने ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याचे कार्य केले जाते. पारदर्शक व्यवहार, माहितीपूर्ण ग्राहक तयार करणे आणि प्रशिक्षित रिअल इस्टेट सल्लागार घडवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.”