
पुणे दि. 26 : बनावट मृत्युपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या रमेश मोहनलाल चोरडिया व इतरांवर माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी तपासात पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा गंभीर आरोप लहुजी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल हातागळे यांनी केला आहे.
हातागळे यांनी सांगितले की, “रमेश चोरडिया यांनी बनावट मृत्युपत्र तयार करून करोडो रुपयांची मालमत्ता बळकावली असून इतर वारसदारांना कोणताही हक्क दिलेला नाही. याप्रकरणी कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही आरोपींवर कारवाई होत नाही. तपासात जाणूनबुजून विलंब केला जात आहे.”
या दिरंगाईविरोधात लहुजी समता परिषदेकडून पुणे पोलीस आयुक्तांना तपास जलदगतीने करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित बरडीया कुटुंबियांसह उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.