
पुणे, दि. २६ : विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील नागरिकांना दिलेल्या प्रगल्भ आणि सर्वसमावेशक भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाज पक्ष (बसपा) वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश महासचिव व पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी केले.
संविधान दिनाचे औचित्य साधून बसपातर्फे ‘संविधान सन्मान रॅली’ काढण्यात आली. पुणे महानगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून तसेच संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून रॅलीची सुरुवात झाली.

ढोल-ताशांच्या गजरात ‘संविधान रथ’ासह मनोवेधक मिरवणूक मनपा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. डेक्कन, बाजीराव रोड, टिळक रोड, लक्ष्मी रोड, चुना बाजार, पुणे कॅम्प मार्गे रॅली पुणे स्टेशनवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पोहोचली. मार्गातील नागरिकांचे लक्ष संविधान रथाने वेधून घेतले.
स्मारकस्थळी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने रॅलीची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी बसपा पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना संविधानाची प्रत भेट दिली.
रॅलीत मा. अशोकदादा गायकवाड, माबाप्पुसाहेब कुदळे, मा. प्रविण वाकोडे, मा. अनिल त्रिपाठी, मा. विजय बेद, मा. अरुण गायकवाड, मा. परशुराम आरूणे, मा. सागर जगताप, मा. राम डावकर, मा. गणेश खंदारे, मा. धम्मदीप लगाडे, मा. प्रभाकर खरात, मा. बंशी रोकडे, तसेच विधानसभा अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.