
पुणे, दि. २६ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक तीनने खेड तालुक्यातील नाणेकरवाडी हद्दीतील मुत्केवाडी येथे छापा टाकून १ लाख १४ हजार ६२५ रुपयांचा बनावट देशी व विदेशी मद्यसाठा जप्त केला. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार २५ नोव्हेंबर रोजी अवैध मद्य विक्री अड्ड्यावर कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान देशी दारू पावर लाईन पंचच्या १८० मिली व ९० मिली क्षमतेच्या एकूण ६४४ बनावट सीलबंद बाटल्या, तसेच विदेशी मद्याच्या ७१ बनावट सीलबंद बाटल्या आणि बनावट दारू प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अहमदसाब पठाण व हरीष ब्रिजेश कुमार चंद्रा या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी खेड यांच्या न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोघांची रवानगी येरवडा कारागृह, पुणे येथे करण्यात आली आहे.
कारवाईत भरारी पथक क्रमांक ३ चे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक वाय. एम. चव्हाण, पी. ए. ठाकरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. डी. साठे, तसेच जवान अमर कांबळे, अनिल दांगट, गिरीश माने, जगन्नाथ चव्हाण, जयदास दाते व वाहनचालक शरद हांडगर यांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्यात बनावट व प्रतिबंधित मद्य विक्रीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती देताना राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी नागरिकांना संशयास्पद मद्यविक्री बाबत तात्काळ विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.