संविधान दिनानिमित्त बार्टीतर्फे ‘वॉक फॉर संविधान’ रॅली उत्साहात; हजारो विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग

पुणे, दि. २६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, पुणे आणि संविधानप्रेमी नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त ‘वॉक फॉर संविधान’ रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी आणि बार्टी विभागप्रमुख मारोती बोरकर, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, उपायुक्त वृषाली शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे, बार्टी विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्यासह विविध संस्था प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, महार रेजिमेंटचे माजी सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

रॅलीत अनेक विद्यार्थी महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते तर काही विद्यार्थ्यांनी संविधान जागृतीचे फलक व घोषणाबाजी केली. ढोल-ताशा, लेझीम पथक यांच्या निनादात रॅलीचे उत्साहपूर्ण वातावरण रंगत गेले.

‘वॉक फॉर संविधान’ रॅलीला भिडेवाडा येथून सुरुवात होऊन लाल महाल – दारुवाला पुल – फडके हौद – १५ ऑगस्ट चौक – जुनी जिल्हा परिषद मार्गे ती पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोहोचली. येथे संविधान प्रास्ताविकेचे वाचन विशाल लोंढे यांनी केले. सामुदायिक वाचनानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमात अधिकारी, नागरिक, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, तसेच बार्टी व सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमातील सर्वांचे आभार सतीश गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button