
पुणे दि. 26 : गणेश फिरंगे मित्र परिवाराच्या वतीने वाघोली येथे आयोजित ‘१६ सोमवारचे उद्यापन तथा महाहोम-हवन’ हा भव्य धार्मिक सोहळा बारा ज्योतिर्लिंग व शक्तीपीठांच्या प्रमुख पुजार्यांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. भगवान महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर निनादला होता. वेदघोष, मंत्रपठण आणि पारंपरिक पूजा-अर्चांमुळे दिव्यता, अध्यात्मिकता आणि पवित्रतेचा संगम अनुभवायला मिळाला.
या सोहळ्यासाठी देशभरातील बारा ज्योतिर्लिंग आणि प्रमुख शक्तीपीठांचे मान्यवर पुजारी उपस्थित होते. यामध्ये —
श्री सोमनाथचे पंडित विशाल कृष्ण प्रसाद जानी, मल्लिकार्जुनचे पंडित मतापती चैतन्यकुमार व मत्तम राजेश्वर, उज्जैन महाकाळेश्वरचे श्री बंटी शर्मा (पीआरओ), परळी वैद्यनाथचे पंडित राघव दिगंबर जोशी, भीमाशंकरचे पंडित मयूर रत्नाकर कोडिलकर व जालिंदर काका कौदरे, नागेश्वरचे पंडित द्यानशन नागनाथ पाठक, त्र्यंबकेश्वरचे पंडित कृपेश योगेंद्र भट्ट, केदारनाथचे पंडित प्रवीणचंद तिवारी, विंध्याचल धामचे पंडित गणेश चंद्र पांडे, तसेच मुंबादेवीचे पंडित अभिषेक तिवारी यांचा समावेश होता. काही पुजार्यांच्या पत्नींचीही विशेष उपस्थिती लाभली.
होम-हवनादरम्यान सामूहिक प्रार्थनेत सर्व भक्तांनी सुख-समृद्धी, आरोग्य, कल्याण आणि समाजाच्या शांततेसाठी मंगलकामना व्यक्त केल्या. महिला मंडळ, गावातील मान्यवर, तसेच गणेश फिरंगे मित्र परिवारातील सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेत अध्यात्मिक आनंद अनुभवल्याची भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य, धार्मिक सौहार्द आणि अध्यात्मिक उर्जा वृद्धिंगत झाल्याचा संदेश उपस्थितांनी दिला.