
पुणे दि. 26 : शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवून २०७० पर्यंत भारताने ठेवलेल्या ‘नेट-झिरो’ उद्दिष्ट्याला हातभार लावण्यासाठी ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल आणि नॉर्वेच्या ईपीडी ग्लोबल यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
ग्रीन सोल्यूशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे आणि आरती भोसले-अहिवळे यांनी पत्रकार परिषदेत या भागीदारीची माहिती दिली.
ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल आणि ईपीडी ग्लोबल यांच्यातील हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा धोरणात्मक करार भारतीय उद्योगसमूहांसाठी पर्यावरणीय उत्पादन घोषणापत्रे (Environmental Product Declaration–EPD) तयार करण्याची अधिकृत व्यवस्था निर्माण करणार आहे.
ईपीडी ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकॉन हाऊआन, तर ग्रीनएक्सच्या वतीने सागर अहिवळे आणि आरती भोसले-अहिवळे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पिटके उपस्थित होते.
तीन वर्षांसाठी झालेल्या या करारामुळे भारतीय उद्योगांचे उत्पादन तयार होताना त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम वैज्ञानिक पद्धतीने तपासला जाणार असून, त्याचा अधिकृत ईपीडी दस्तऐवज उत्पादकांच्या संकेतस्थळावर आणि उत्पादनांवर उपलब्ध राहणार आहे.
सागर अहिवळे म्हणाले, “पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी ही भागीदारी महत्वाची आहे. भारताच्या नेट-झिरो उद्दिष्ट्याच्या पूर्ततेसाठी हा पुढाकार अत्यंत उपयुक्त ठरेल.”