
पुणे, दि. २५ : मराठी रंगभूमीवर मैत्री, भावना आणि वडील–मुलगी नात्याची अनोखी सांगड घालणारं नवं कोरं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वर्षानुवर्षे दडलेली कटुता, अचानक आयुष्यात आलेली अनोळखी व्यक्ती आणि त्यामुळे बदललेली समीकरणे या सर्वांचा वेध घेणारी कथा या नाटकात पाहायला मिळणार आहे. वडील–मुलीच्या नात्यात कोणी तिसरा येतो, त्याच्या आगमनामागील रहस्य काय, याचे उत्तर प्रेक्षकांना नाटक पाहताना मिळेल.
या नाटकाची खासियत म्हणजे मराठी रंगभूमीवरील दोन दिग्गज — भरत जाधव आणि महेश मांजरेकर — पहिल्यांदाच एकत्र रंगमंचावर झळकणार आहेत. त्यातही महेश मांजरेकर तब्बल २९ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
दिग्दर्शक सुरज पारसनीस म्हणाले, “हे नाटक फक्त मनोरंजन नाही, तर नात्यांमधल्या अदृश्य धाग्यांना स्पर्श करतं. मैत्री आणि पित्याच्या नात्याचा वेगळा पैलू यात उलगडेल.”
निर्माते आणि अभिनेते भरत जाधव सांगतात, “महेशजींसोबत काम करणे हा नेहमीच एक अनोखा अनुभव असतो. आम्ही एकमेकांच्या कामाबद्दलच्या अपेक्षा उत्तम जाणतो. आता आम्ही रंगभूमीवर एकत्र येत आहोत, हीच खरी जादू ठरणार आहे.”
तर महेश मांजरेकर म्हणाले, “२९ वर्षांनंतर रंगभूमीवर परत येणं ही माझ्यासाठी भावनिक बाब आहे. ‘शंकर-जयकिशन’ची कथा वाचताच मला जाणवलं की हे नाटक रंगभूमीवर आलंच पाहिजे. भरतसोबत काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळते.”
भरत जाधव एंटरटेन्मेंट निर्मित आणि सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी यांनी केले असून, गीत क्षितिज पटवर्धन यांचे आहेत.
या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
‘शंकर-जयकिशन’ नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे.