
पुणे, दि. २५ : गडकरी रंगायतन, ठाणे येथे सादर झालेल्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकाच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाटकातील कलाकार श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे यांच्या दमदार जुगलबंदीच्या प्रसंगाने रंगमंचावर अक्षरशः खळबळ उडवली.
प्रसंग इतका रंगला की प्रेक्षकांनी दोघांना “वन्समोअर” अशी दाद दिली. व्यावसायिक रंगभूमीवर नवीन असलेल्या या दोघांना अचानक मिळालेल्या या प्रेमामुळे ते क्षणभर गोंधळून गेले; मात्र नाटकाचा प्रवाह अबाधित ठेवत त्यांनी पुढील अभिनय सुरू ठेवला.
नाटकानंतर रसिक प्रेक्षक मेकरूममध्ये कलाकारांना भेटण्यासाठी आले. त्यांनी श्रेयस, वैभव आणि इतर कलाकारांचे कौतुक करत,
“तुम्ही तिघेही अप्रतिम काम करत आहात. फ्रेश लूकची तुमची कॉमेडी पाहून आम्ही खूप एन्जॉय केलं,”
असे सांगत पुढील प्रयोगांसाठी शुभेच्छादेखील दिल्या. यावेळी अनेक प्रेक्षकांनी कलाकारांसोबत फोटोही घेतले.
प्रेक्षकांनी विशेष विनंती केली की, “पुढील प्रयोगात जर तुमच्या गाण्यांना वन्समोअर मिळाला, तर तो जरूर घ्या.”
ठाण्यातील हा प्रयोग यशस्वी ठरवत ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाने रसिकांच्या मनात ठसा उमटवल्याचे स्पष्ट दिसले.