औंध–बोपोडीतील पदपथांचे लेखापरीक्षण करा; पादचाऱ्यांना सुरक्षित फुटपाथ द्या – आम आदमी पार्टीची मागणी

पुणे, दि. २५ : औंध–बोपोडी परिसरातील पादचारी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ३ नोव्हेंबर रोजी एम. एम. हॉटेल शेजारील गणेश मंदिराजवळ फूटपाथवरील अतिक्रमणामुळे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका महिलेला टेम्पोने धडक दिली. या अपघातात सदरची महिला गंभीर जखमी झाली.

या घटना पार्श्वभूमीवर सुरक्षित फूटपाथ निर्माण करावेत आणि मोठ्या वाहनांना योग्यरीत्या यू-टर्न घेता यावा यासाठी नियोजन करावे, अशी मागणी आम आदमी पार्टी (AAP) ने केली आहे. या संदर्भात मुकुंद किर्दत, ॲनी अनिश, विकास चव्हाण, अनिश वर्गीस यांनी सुमारे २५० नागरिकांच्या सह्या गोळा करून औंध मनपा उपयुक्त यांना निवेदन दिले.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत औंध–बोपोडी परिसरात कामे झाली असली तरी पादचाऱ्यांसाठी आवश्यक तेवढे सुरक्षित व सलग फुटपाथ उपलब्ध नाहीत. ब्रेमेन चौक ते खडकी रेल्वे स्टेशन हा रस्ता सतत वाहता असून ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. आंबेडकर चौक ते खडकी स्टेशनदरम्यान अनेक ठिकाणी फूटपाथवर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना रस्त्यावर उतरून चालावे लागते.

अतिक्रमणांचे पुनर्वसन अथवा हटविण्याची मागणी करत AAP ने सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या पादचारी सुरक्षेसंदर्भातील निर्देशांचे पालन करून पदपथांचे सविस्तर लेखापरीक्षण व कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे.
AAP चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी महानगरपालिकेला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button