टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताला परीक्षा परिषदेचे खंडन; आयुक्त अनुराधा ओक यांचे स्पष्टीकरण

पुणे, दि. २५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भातील पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट खंडन करण्यात आले आहे. ‘टीईटी चा पेपर ३ लाखांत! शिक्षकांची टोळीच जेरबंद’ या आशयाचे दैनिक लोकमतमध्ये २४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेले वृत्त तथ्यहीन असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी जाहीर केले आहे.

परिषदेकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात सांगण्यात आले आहे की, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून त्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत सर्व प्रक्रिया अत्यंत गोपनीयता, कडक नियम आणि काटेकोर नियंत्रणाखाली पार पाडल्या जातात. तज्ञांकडून तयार केलेले प्रश्नसंच स्वतंत्रपणे सीलबंद पाकिटांत ठेवले जातात. यादृच्छिकपणे निवडलेला प्रश्नसंचच गोपनीय मुद्रणालयाकडे पाठवला जातो.

मुद्रणालयातून वर्गनिहाय सीलबंद पाकिटे बॉक्समध्ये भरून ती सिलबंद गाड्यांतून संबंधित जिल्हा कस्टडीत पाठवली जातात. बहुतेक जिल्ह्यांत या बॉक्सची कस्टडी कोषागारात ठेवली जाते, अन्यथा सीसीटीव्ही व हत्यारबंद पोलिस बंदोबस्त असलेल्या केंद्रात सुरक्षित ठेवली जाते.

जिल्हा परीरक्षक आणि शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित साहित्य स्वीकारले जाते. परीक्षा दिवशी झोनल ऑफिसरकडे बॉक्स हस्तांतरणाची तसेच केंद्रापर्यंतच्या प्रवासाची व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे नोंद घेतली जाते. उमेदवारांच्या समोरच ब्लॉकनिहाय सीलबंद पाकिटे उघडली जातात.

राज्यभरातील कोणत्याही जिल्ह्यात प्रश्नपत्रिका सिलबंद नसल्याच्या, गाड्या उघड्या असल्याच्या किंवा बॉक्समध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये समोर आलेल्या प्रकरणाशी परीक्षा परिषदेचा कोणताही संबंध नसल्याचे आयुक्त ओक यांनी ठामपणे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button