गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण: नर्तिका पूजा गायकवाडला बार्शी सत्र न्यायालयाचा जामीन

पुणे दि. 25 :
राज्यभरात चर्चेत असलेल्या माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणात अटक झालेल्या नर्तिका पूजा गायकवाड (रा. सासुरे, ता. बार्शी) हिला बार्शी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 9 सप्टेंबर रोजी लुखामसलाचे (ता. गेवराई) माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी पूजाच्या सासुरे येथील घरी समोर आपल्या गाडीत रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली होती.

अटकेनंतरपासून पूजा गायकवाड जामिनासाठी प्रयत्नरत होती. तिने अॅड. धनंजय माने यांच्या मार्फत दाखल केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला.

दरम्यान, या प्रकरणामागील पार्श्वभूमी अत्यंत गंभीर आहे. तमाशा पाहण्याची आवड असलेल्या गोविंद बर्गे यांची दीड वर्षांपूर्वी थापडीतांडा येथील कला केंद्रात पूजा गायकवाडशी ओळख झाली. ही ओळख पुढे मैत्रीतून प्रेमसंबंधात परिवर्तित झाली. पूजाला भेटण्यासाठी गोविंद वारंवार पारगाव कला केंद्रावर जात होते. प्रेमसंबंध दृढ झाल्यानंतर त्यांनी पूजाला पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, काही सोन्याचे दागिने दिल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे, तर तिच्या नात्यातील व्यक्तींच्या नावावर मालमत्ता केल्याचीही माहिती चौकशीत उघड झाली आहे.

मात्र काही आठवड्यांपासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. पूजा गायकवाडने अचानक संवाद तोडल्यानंतर तिने गोविंद यांच्याकडून गेवराईतील बंगला आणि पाच एकर शेती तिच्या व तिच्या भावाच्या नावावर करण्याची मागणी केली, असा दावा तपासात नोंद झाला आहे. ही मागणी मान्य न झाल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिल्याचेही समोर आले आहे.

या सर्व घडामोडींमुळे मानसिकरीत्या व्यथित झालेले गोविंद बर्गे खोल नैराश्यात गेले होते. प्रेमातील तणाव, धमक्या आणि सततचा मानसिक दबाव यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जीव घेण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button