
पुणे दि. 25 : भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मानधना हिला लग्नाच्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. तिचे वडील श्रीनिवास मानधना यांना लग्नाच्या काही तासांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंब एकदम हादरून गेलं.
दरम्यान, आणखी एक अनपेक्षित घटना घडली. स्मृतीचा होणारा पती पलाश मुच्छल याचीही तब्येत अचानक बिघडली आणि त्यालाही रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे लग्नाच्या दिवशी संपूर्ण वातावरणात गोंधळ आणि काळजीचं सावट पसरलं.
स्मृती मानधना तिच्या वडिलांच्या अत्यंत जवळ आहे. वडिलांची प्रकृती स्थिर होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्मृतीने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र तिच्या या निर्णयाची अधिकृत घोषणा झाली नसतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील साखरपुडा, संगीत आणि लग्नासंबंधित सर्व फोटो डिलिट केले आहेत. तिने असं का केलं याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी या कृतीनंतर लग्न पुढे ढकलल्याच्या चर्चेला आणखी वेग आला आहे. स्मृती आणि पलाशचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
या दोन्ही घटना आणि सोशल मीडियावरील तिच्या हालचालींमुळे चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्मृती काही दिवसांत अधिकृत निवेदन देऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.