
पुणे दि. 25 : काही दिवसांपूर्वी पुण्यात फुरसुंगी परिसरात कोयता टोळीने 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चारचाकी, रिक्षा आणि इतर वाहनांची उद्ध्वस्त केलेली अवस्था पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. वाहनांची तोडफोड करताना टोळीकडून मोठ्याने घोषणाबाजीही करण्यात आली होती, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आणि अखेर संबंधित आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. मात्र, यावेळी पोलिसांनी आरोपींना धडा शिकवण्याची विशेष पद्धत अवलंबली. नागरिकांसमोरच आरोपींना चोप देत त्यांची धिंड काढण्यात आली. एवढ्यावर न थांबता पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावर चालायला लावत त्याच ठिकाणी शिक्षा दिली, जिथे त्यांनी वाहनांची तोडफोड केली होती.
या कारवाईदरम्यान मोठी नागरिकांची गर्दी जमली होती. पोलिसांनी दाखवलेल्या कठोर भूमिकेचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून परिसरात कायदा-सुव्यवस्थेबाबत विश्वास वाढल्याचे पाहायला मिळत आहे.