
पुणे, दि. २४ : आशियातील अग्रगण्य आणि एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणारी संस्था अपोलो हॉस्पिटल्सने महाराष्ट्रातील आपले तिसरे आणि पुण्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक हॉस्पिटल स्वारगेट येथे सुरू केले. टप्प्याटप्प्याने सुरू होणार्या या रुग्णालयातील सध्या २५० बेड्स उपलब्ध असून पूर्ण क्षमतेनुसार ते ४०० बेड्सचे असणार आहे. बदलत्या आरोग्य गरजांना प्रतिसाद देत या प्रदेशातील आरोग्य क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवणे हा अपोलोचा उद्देश आहे.
अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी सांगितले की, “भारतासाठी आणि जगासाठी आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडविणे हे आमचे ध्येय आहे. ‘Heal in India – Heal by India’ व्हिजननुसार आम्ही जागतिक दर्जाच्या करुणायुक्त आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा प्रदान करण्यास कटिबद्ध आहोत.”
पुणे शहर हे वेगाने बदलणाऱ्या आरोग्य गरजांचे केंद्र असल्याने अपोलोने येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हेल्थकेअर सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. क्लिनिकल उत्कृष्टता आणि नावीन्य यांवर आधारित अपोलो हॉस्पिटल्सचा चार दशकांचा वारसा पुढे नेण्याचे काम हे रुग्णालय करणार आहे, असे अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. प्रीता रेड्डी यांनी सांगितले.
अपोलो एंटरप्राइजेसच्या व्यवस्थापकीय संचालिका सुनीता रेड्डी यांनीही पुण्यातील हे नवे हॉस्पिटल राष्ट्रीय विस्तारातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. “पुण्यासारख्या वाढत्या बाजारपेठेत क्वाटर्नरी केअरचे केंद्र स्थापन करून आम्ही अत्याधुनिक एकात्मिक आरोग्य इकोसिस्टम शहरात आणत आहोत,” असे त्या म्हणाल्या.
अपोलो समूहाचे सीईओ आणि अध्यक्ष डॉ. मधू ससिधर यांनी सांगितले की, रुग्ण-केंद्रितता, सुरक्षा, पुराव्यावर आधारित उपचार आणि पारदर्शकता यांच्या पायावर हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.
पुणे हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मनीषा कर्माकर यांनी सांगितले की, तंत्रज्ञान, नावीन्य आणि आयटी विकासासाठी ओळख असलेल्या पुण्याच्या प्रगतीत हातभार लावणे हा अपोलोचा हेतू आहे.
नवीन हॉस्पिटलमध्ये प्रगत सर्जिकल रोबोटिक्स, अचूक ऑन्कोलॉजी, कार्डियाक सायन्सेस, ट्रान्सप्लांट, ऑर्थोपेडिक्स, माता-बाल आरोग्य, तसेच एकात्मिक डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्मसह आयओटी-सक्षम मॉनिटरिंग, टेलिहेल्थ सुविधा, मल्टी-डिसिप्लिनरी टीम, आणि मॉड्यूलर ओटी अशा आधुनिक सोयी उपलब्ध आहेत. हे रुग्णालय पश्चिम भारतातील जटिल उपचारांसाठी एक प्रमुख संदर्भ केंद्र ठरणार आहे.