
पुणे दि. 24 : मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. वरळी येथील बीडीडी वसाहतीत हा प्रकार घडला. गौरीच्या कुटुंबीयांनी मात्र हा आत्महत्येचा मामला नसून हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
गौरीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अनंत गर्जेचे विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात कुरबूर सुरू होती. या प्रकरणात अनंतसह त्याच्या कुटुंबीयांकडून गौरीला त्रास दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
चार वर्षांपूर्वी, 16 नोव्हेंबर 2021, लातूर येथील ममता हॉस्पिटलमधील गर्भवती संमतीपत्रातील माहितीवरून अनंत आणि किरण नावाच्या महिलेचे संबंध असल्याचा गौरीच्या वडिलांना संशय आला. हे कागदपत्र घर बदलताना मिळाल्याचे गौरीने वडिलांना सांगितले होते. त्यानंतर गौरीला माहेरी येण्यास सांगितल्यावर, “मी आले तर अनंत आत्महत्या करून माझे नाव लिहिलेल्या चिठ्ठी ठेवेल,” अशी भीती गौरीने व्यक्त केली होती.
या सर्व वादातून 22 नोव्हेंबर रोजी गौरीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या प्रकरणात वरळी पोलिसांनी अनंत गर्जेची मध्यरात्री अटक केली असून इतर दोन आरोपी फरार आहेत.
कुटुंबीय या मृत्यूला संशयास्पद मानत असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करत आहेत.