घोरात्कष्टात स्तोत्र पठणात शेकडो दत्तभक्तांचा सहभाग; १२८ व्या दत्तजयंती उत्सवाला उत्साहात सुरुवात

पुणे दि. 24 : “गुरुदेव दत्त… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…” या जयघोषाने आणि “नर्मदे हर हर” च्या निनादात बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर परिसर मंगलमय झाला. १२८ व्या दत्तजयंती उत्सवानिमित्त आयोजित सामुदायिक ‘घोरात्कष्टात’ स्तोत्र पठणात पुणे व जिल्ह्यातील शेकडो दत्तभक्तांनी सहभाग नोंदवला. सामाजिक व अध्यात्मिक शुद्धीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात भाविकांनी दत्तचरणी नतमस्तक होऊन मनःपूर्वक प्रार्थना केली.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात दत्तजयंती उत्सवाची सुरुवात या सामूहिक पठणाने झाली. कार्यक्रमाला अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प. पू. बाबा महाराज तराणेकर (इंदोर), जया तराणेकर, प. पू. नारायणरत्न शरदशास्त्री जोशी महाराज, देविदास जोशी, हरी मुस्तीकर, डॉ. भावार्थ देखणे आदी मान्यवर उपस्थित होते.

बाबा महाराज तराणेकर यांचा अमृतमहोत्सवी सन्मान

बाबा महाराज तराणेकर यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा ७५ कमलपुष्पांचा हार, ७५ गुलाबपुष्पांचा गुच्छ देऊन आणि ७५ भगिनींनी औक्षण करून भव्य सन्मान करण्यात आला. गुरूपरंपरा दर्शविणारे दत्तात्रेय, टेंबे स्वामी, नाना महाराज व बाबा महाराज यांचे विशेष छायाचित्र यावेळी प्रदान करण्यात आले.
करुणा त्रिपदी आणि श्री दत्त प्रतिकारण स्तोत्र या पुस्तिकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमातील विचार

शरदशास्त्री जोशी म्हणाले, “वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणजे मानवतेची गाथा आहेत. त्यांच्या स्तोत्राच्या सामूहिक पाठातून त्यांचे स्मरण आणि लोककल्याण यांची अनुभूती होते.”

प. पू. बाबा महाराज तराणेकर म्हणाले,
“दत्तजयंतीची सुरुवात घोरात्कष्टातच्या सहस्त्र आवर्तनाने करणारी परंपरा देशातील एकमेव परंपरा येथे आहे. हे स्तोत्र केवळ उपासना नसून आजूबाजूच्या परिसराच्या शुद्धीकरणाची दैवी चिकित्सा आहे.”

ट्रस्ट अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की, अवघ्या २०-२५ साधकांपासून सुरू झालेला हा उपक्रम आज महाराष्ट्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, ब्रिटनसह विविध देशांमध्ये ऑनलाइन पद्धतीने साजरा होत आहे.

स्वच्छतादूत अंजली माने यांचा सन्मान

सदाशिव पेठेत कचराकुंडीत सापडलेले रु. १० लाख प्रामाणिकपणे परत करणाऱ्या स्वच्छतादूत अंजली माने यांचा ट्रस्टतर्फे महावस्त्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

आयोजन व सूत्रसंचालन

उत्सवाचे आयोजन ट्रस्ट अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. पराग काळकर यांनी तर आभार युवराज गाडवे यांनी मानले. प्रिया निघोजकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ :

दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण करताना भाविक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button