
पुणे दि. २३ : २०१४ नंतर “आर्थिक महासत्ता” होऊ घातलेल्या भारताची दयनीय अवस्था करून, स्वतःच्या कार्यकुशलतेपेक्षा दिशाभूल करणाऱ्या विधानांमध्ये समाधान मानणाऱ्या भाजप नेत्यांवर काँग्रेसने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी भाजप सरकारवर विश्वासघात, अपयश आणि बेजबाबदारपणाचे गंभीर आरोप केले.
तिवारी म्हणाले, “२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांना पकडून मृत्युदंड देणाऱ्या काँग्रेस सरकारवर हल्ला करणे सोपे; पण भाजपने १९९९–२००४ दरम्यान मसूद अजहरसह धोकादायक दहशतवाद्यांना कंधार विमानतळावर सोडले हे त्यांना विसरते.”
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात जाऊन वाढदिवसाच्या समारंभात केक-बिर्याणीचा आस्वाद घेतला. अटल बिहारी वाजपेयींच्या लाहोर बस यात्रेनंतर पाकिस्तानात जाणारे नेते केवळ भाजपचेच — मोदी आणि अडवाणी — असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“काँग्रेसच्या काळात एकही नेता पाकिस्तानला विनानिमंत्रण गेला नाही,” असे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली पाकिस्तानी कारवाई थांबवणारा भाजप आज काँग्रेसला उपदेश देत फिरतो, अशी टीका त्यांनी केली.
उरी, पठाणकोट, पुलवामा, पहलगाम आणि दिल्लीतील वारंवार होणारे दहशतवादी हल्ले, शेकडो किलो आरडीएक्सचे सतत होणारे घुसखोरी प्रयत्न — या सर्वांवर सुरक्षा यंत्रणा का अपयशी ठरली याचे उत्तर भाजपकडे नाही, असा आरोप तिवारी यांनी केला.
दुबई एअर शोदरम्यान कोसळलेल्या तेजस लढाऊ विमानासंदर्भातही तिवारींनी प्रश्न उपस्थित केले. “इतका आत्मनिर्भरतेचा गजर करणारे भाजप नेते, अमेरिकन इंजिन आणि फ्रान्स–इस्राईलच्या पार्ट्सवर बनलेले तेजस उडवतात. संरक्षण दल प्रमुखांच्या तक्रारीवरही सरकार गप्प का?” असा सवाल त्यांनी केला.
सरकारी जमिनी, महसूल, स्टॅम्प ड्युटी घोटाळे आणि सत्तेच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार दडपण्याची वृत्ती भाजपमध्ये वाढत असल्याचाही आरोप त्यांनी केला. महसूल मंत्री बावनकूळे यांच्या कॅसिनोतील कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीवरही त्यांनी निशाणा साधला.