
पुणे दि. 23 : आपला गड, आपली जबाबदारी’ या संकल्पनेतून सिंहगड किल्ल्यावर व्यापक स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात राज्यभरातून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी सहभाग नोंदवून गडप्रेमाचे दर्शन घडवले. “मी खासदार म्हणून नव्हे, तर शिवरायांचा मावळा म्हणून या मोहिमेत सहभागी आहे,” असे खासदार लंके यांनी सांगितले.
सकाळी नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळी जिजाऊ वंदना व संवर्धन प्रतिज्ञेनंतर मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर गडावरील २१ पथकांनी कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, बालेकिल्ला, राजाराम महाराज समाधी परिसर, तानाजी मालुसरे समाधी परिसर आदी ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता केली. प्लास्टिक, काच, कचरा, काटेरी झुडपे, वाळलेले गवत काढून पायवाटा मोकळ्या करण्यात आल्या.
नगर, सातारा, सांगली व पुण्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रम यशस्वी केला. स्वयंसेवकांच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष अनिकेत चव्हाण यांनी पार पाडली, तर भोजनाची व्यवस्था दीपक खिरीड यांनी केली.
गेल्या काही महिन्यांपासून ‘आपला मावळा’ संघटनेतर्फे दर महिन्याला विविध किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत. याअंतर्गत शिवनेरी, रायरेश्वर, भुदरगड, धर्मवीर गड, तिकोना येथेही उपक्रम पार पडले आहेत.
“गड म्हणजे दगडांचा ढिगारा नव्हे; तो स्वराज्याचा आत्मा आहे. पुढील पिढ्यांना इतिहास सुस्थितीत पोहोचण्यासाठी ही मोहीम आमचा संकल्प आहे,” असे खासदार लंके म्हणाले.
विशेष म्हणजे, खासदार लंके स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करताना दिसले. किल्ल्यावर सौरदिवे, कचराकुंड्या, बाकडे आणि दिशादर्शक फलक उभारण्यात आले असून पर्यटकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, मालेगावातील चिमुरडीवरील अत्याचाराबाबत विचारले असता लंके म्हणाले, “महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत; आता खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज आहे.”