आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल; बायोफोर्टिफाइड झिंक-गहू व लोहयुक्त धान्य समावेशासह सामंजस्य करार

पुणे, दि. 21 : आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव आणि न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि. यांच्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यवर्धनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचा उद्देश आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आहारात बायोफोर्टिफाइड झिंक-समृद्ध गहू आणि लोहयुक्त बाजरीचा समावेश करून त्यांचे पोषणमान उंचावणे हा आहे.

या कार्यक्रमांतर्गत ९ हजार विद्यार्थ्यांना सुरुवातीला बायोफोर्टिफाइड धान्य पुरवठा केला जाणार असून सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार दररोज ३० ग्रॅम धान्य आठवड्यातून दोनदा दोन महिन्यांसाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर हा आहार नियमितपणे विद्यार्थ्यांच्या भोजनात समाविष्ट केला जाईल.

तसेच, एक हजार विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी आठवड्यातून तीन वेळा झिंक-समृद्ध गहू आणि लोहयुक्त बाजरीपासून तयार करण्यात आलेले पौष्टिक लाडू आणि कुकीज दिले जाणार आहेत.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये पोषणविषयक जागरूकता वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण, कार्यशाळा व क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित केले जातील. न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि.चा भागीदार अॅग्रोझी ऑर्गेनिक्स (उरुळी कांचन, पुणे) या उपक्रमात सहकार्य करणार आहे.

हा करार आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि पोषणवर्धनासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण आणि प्रशंसनीय पाऊल असल्याचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button