परिचारिकांना योग्य वेतन-सुरक्षेसाठी प्रयत्नशील; ‘एआय’ आले तरी मानवी स्पर्शाची जागा नाही — डॉ. ॲनी कुमार”

राजबाग (लोणी काळभोर) : “प्रगत तंत्रज्ञानाची जोड, भावनिक आधार आणि दिलासादायी मानवी हातांचा स्पर्श ही उत्तम परिचारिकेची खरी ओळख आहे. आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत असला, तरी परिचारिकांच्या मानवी स्पर्शाची व भावनिक साथ देण्याची क्षमता कोणीही घेऊ शकत नाही. परिचारिकांना योग्य वेतन, सन्मान आणि सुरक्षा मिळण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत,” असे प्रतिपादन दी ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाच्या (TNAI) राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ॲनी कुमार यांनी केले.

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी आयोजित तीन दिवसीय ३१ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय नर्सिंग परिषदेचे वर्ल्ड पीस डोम, राजबाग येथे उद्घाटन झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या परिषदेमध्ये दी ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (TNAI), TNAI महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि माईर्स विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांचे संयुक्त आयोजन आहे.

कार्यक्रमाला TNAIच्या राष्ट्रीय महासचिव एव्हलिन कन्नन, पश्चिम विभाग उपाध्यक्ष दीपकमल व्यास, महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष राजाभाऊ राठोड, सचिव रत्ना देवरे, तसेच विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्राचार्य डॉ. शिवचरणसिंग गंधार यांची उपस्थिती लाभली.

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. देशभरातील ३,००० हून अधिक नर्सिंग विद्यार्थी या महत्त्वपूर्ण परिषदेला उपस्थित राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button