असंभव80s’ ट्रेंडची कलाकारांना भुरळ! – ‘असंभव’ चित्रपटातील 80s लूक सोशल मीडियावर ट्रेंडिंग

सध्या सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्सची रेलचेल सुरू असताना मराठी चित्रपटसृष्टीत एक अनोखा आणि आकर्षक ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला ‘#असंभव80s’ हा ट्रेंड सेलिब्रिटींपासून ते प्रेक्षकांपर्यंत वेगाने पसरत आहे.

एआयच्या मदतीने ८०च्या दशकातील लूक साकारत मराठी चित्रपटसृष्टीतील सुमित राघवन, अंकुश चौधरी, अवधुत गुप्ते, सुबोध भावे, अभिजीत पानसे, आनंद इंगळे, संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री, सुयश टिळक, प्रिया बेर्डे, रेशम टिपणीस, कविता लाड, गौरी कुलकर्णी यांसह अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर केल्या आहेत. या कलाकारांच्या ८०च्या दशकातील लूकवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

‘असंभव80s’ हा ट्रेंड व्हायरल होण्याचे मुख्य कारण म्हणजे चित्रपटातील ८०च्या दशकातील ग्लॅम लूक आणि उठावदार गेटअप. चित्रपटातील वेशभूषा, रंगसंगती, सेट डिझाइन आणि कलाकारांचे रेट्रो गेटअप आधीच चर्चेचा विषय झाले आहेत. रिलीजपूर्वीच सोशल मीडियावर मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालत आहे.

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केले असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार बहुप्रतिभावान कलाकार — सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी — पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.

‘मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत.

‘असंभव’ हा चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button