आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला कोर्टाचा दणका; तीन महिने सश्रम कारावास

पुणे दि. 21 :
आई-वडिलांनी आयुष्यभर मुलांचा सांभाळ केला, त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या. मात्र मुलं मोठी झाल्यानंतर अनेकदा पालकांना ओझं समजण्याची दुर्दैवी वेळ येते. त्याच पालकांच्या त्यागाचा विसर पडून त्यांची उपेक्षा करणाऱ्या मुलाला पुणे जिल्ह्यातील न्यायालयाने कडाडून दणका दिला आहे.

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात न्यायालयाने एका मुलाला तीन महिने सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. “आई-वडिलांची सेवा ही नैतिकच नव्हे तर कायदेशीर जबाबदारी आहे” हा ठळक संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

निमगाव सावा येथील विठ्ठल बाबुराव गाडगे (वय 80) यांनी आपल्या दोन्ही मुलांकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात नारायणगाव पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, सप्टेंबर 2022 ते मे 2025 दरम्यान दोन्ही मुलं त्यांच्या घरात राहत होती. मात्र या काळात त्यांनी आई-वडिलांची कोणतीही जबाबदारी पार पाडली नाही. अन्न, औषधोपचार, देखभाल यापैकी कुठल्याही गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले नाही. आपल्या घरातच परक्यासारखी वागणूक मिळत असल्याने विठ्ठल गाडगे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

ज्येष्ठ नागरिक व पालकांचे संरक्षण व कल्याण कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलीस हवालदार एस. एम. कोकणे यांनी केला. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी पुराव्यांचा अभ्यास करून आरोपी लक्ष्मण विठ्ठल गाडगे यांना दोषी ठरवले आणि शिक्षा सुनावली.

हा निकाल समाजासाठी एक महत्वपूर्ण संदेश ठरला आहे.
“पालकांचा सांभाळ हा पर्याय नाही, कर्तव्य आहे” — ही भावना समाजात अधिक दृढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button