मालेगावात संतापाचा भडका; तीन वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार-खून प्रकरणी नागरिकांचा न्यायालयात  घुसण्याचा प्रयत्न

पुणे दि. 21 : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व खून प्रकरणानंतर परिसरात तीव्र संताप उसळला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला पाहताच संतप्त नागरिकांनी न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला. कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणावर जमलेल्या लोकांनी पोलिसांना ढकलत आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या मागणीसाठी काढण्यात येणारे मोर्चे, घोषणाबाजी आणि आंदोलनांमुळे वातावरण तापले आहे.

न्यायालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाल्याने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याआधीही महिला आणि तरुणांनी न्यायालय आवारात ठिय्या आंदोलन करत आरोपीला कडकात कडक शिक्षा मिळावी अशी मागणी केली होती.

मालेगाव कॅम्प रोड परिसरात गेल्या चार दिवसांपासून आरोपीविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. परिस्थिती पाहता आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात आणले जाईल की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले जाईल, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु, आज आरोपीला कोर्टात आणताच नागरिकांचा प्रचंड रोष उफाळून आला.

या घटनेमुळे मालेगाव न्यायालय परिसर कडेकोट बंदोबस्तात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button