
पुणे दि. 21 : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह अहमदनगर आणि राज्यातील विविध भागात बिबट्यांचा उच्छाद वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत अनेक नागरिक जखमी झाले असून काही ठिकाणी बळीही गेले आहेत. वाढत्या घटनांवरून राज्यभर संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी एक धक्कादायक दावा करत राज्य सरकार आणि संबंधित विभागाला लक्ष्य केले आहे.
लंके म्हणाले, “गुजरातमधील बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर आणून सोडले जात आहेत. गुजरात–महाराष्ट्र सीमारेषेवर असलेल्या सापुतारा भागातून हे बिबटे महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत.” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
दरम्यान, बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण ते शहरी भागांतून नागरिकांमध्ये प्रचंड चिंता आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांच्या भीतीने शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना रात्री बाहेर पडण्यासही भीती वाटू लागली आहे.
राज्यात विविध ठिकाणी रस्तारोको, आंदोलने होऊन प्रशासनाला धडक देण्यात आली आहे. संतप्त नागरिकांनी नरभक्षक बिबट्यांना तातडीने ठार मारावे, अशी मागणी केली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “नरभक्षक किंवा कोणताही बिबट्या संशयास्पद वाटल्यास त्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत,” असे नाईक यांनी स्पष्ट केले. तरीही सध्या राज्यातील परिस्थिती गंभीर असून ग्रामीण तसेच शहरी भागांत बिबट्यांचा वावर सुरूच आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.